पुणे – चिप्स आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दुकानदाराला वीस वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी सुनावली. दंड भरल्यास दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पीडितेचे वय लहान आहे. वैद्यकीय पुराव्यावरून मुलगी म्हणते त्याप्रमाणे घटना घडल्याचे सिध्द झाले आहे. मुलीवर अविश्वास दाखविण्यासारखे कोणतेही उत्तर उलटतपासणीमध्ये आलेले नाही. समाजात योग्य संदेश जाण्यासाठी अधिकाधिक शिक्षा देण्याचा युक्तीवाद सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
प्रकाश बाबुराव ओझा (वय 35) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. 7 जुलै 2019 रोजी दुपारी 2 ते 4 या कालावधीत सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सुनील हांडे यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित आठ वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जगताप आणि कॉन्स्टेबल गणेश तळेकर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी पक्षाला मदत केली.