नवी दिल्ली : देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील एका व्हिडीओने देशात नवीन वादळ निर्माण केले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत एख तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच धाडसाने उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देताना पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या मांडयामधील आहे. या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवलं आहे”. भीख मागून आणि रडून काही मिळत नाही असे ओवैसी या व्हिडीओत म्हणाले आहेत. या मुलीने जे काम केले त्यासाठी फार धाडस लागतं असेही ओवैसी म्हणाले आहेत.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे नाव मुस्कान आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रासोबतच्या संभाषणादरम्यान मुस्कानने आपण असे का केले याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी बोलताना मुस्कान म्हणाली की, आपण कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. ते लोक आपल्याला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचं असं ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कॉलेजच्या आतील तर अनेक बाहेरचे होते.
या घटनेविषयी माहिती देताना पुढे मुस्कान म्हणाली, “जेव्हा त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा मी ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा दिली. आपले शिक्षक आणि प्राध्यापकांनी पाठिंबा दिल्याचेही तिने म्हटले आहे. बुरखा हटवला नाही तर आम्हीदेखील भगवा कपडा हटवणार नाही अशी धमकी ते देत होते असा आरोप तिने केला आहे. ते वारंवार मला घेरत होते असेही तिने सांगितले आहे.
दरम्यान, व्हिडीओमध्ये मुस्कान हिजाब घालून एका महाविद्यालयाच्या आवारात स्कूटीवर आल्याचे दिसत आहे. स्कूटी पार्क करून ती महाविद्यालयात जात असताना काही विद्यार्थी भगव्या रंगाचं उपरणं हातात घेऊन ‘जय श्री राम’च्या घोषणा देताना दिसत आहेत. ती पुढे कॉलेजच्या इमारतीमध्ये जाताना देखील ही मुलं मुलीच्या मागोमाग घोषणा देताना जात असल्याचं दिसत आहे. पुढे आल्यानंतर ही मुलगी देखील नंतर ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देताना दिसत आहे.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.