नवी दिल्ली – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना एक नवीनच आश्चर्यकारक खुलासा करताना आपणच उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू शकतो, असे सनसनाटी संकेत दिले आहेत.
पत्रकारांनी त्यांना आज नेहमीचा तुमचा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना प्रियकांनी मिष्कील शैलीत उत्तर दिले की, तुम्हाला माझाच चेहरा सगळीकडे दिसत नाही काय?. यावर पत्रकारांनी त्यांना पुन्हा स्पष्टीकरण विचारले असता त्यावेळीही त्यांनी पुन्हा माझा चेहरा तुम्हाला दिसतो की नाही असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी प्रियंका गांधी याच कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरू शकतात, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
कॉंग्रेसने आज उत्तर प्रदेशातील निवडणुकीसाठी युवकांसाठीचा एक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. राहुल व प्रियंका या दोघांच्या उपस्थितीत आज त्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना हे संकेत दिले. यावेळी तुम्ही प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार का, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, अजून त्याविषयी निश्चित काहीही ठरलेले नाही, ते जेव्हा ठरेल त्यावेळी तुम्हाला सांगितले जाईल.
प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही त्या मुख्यमंत्री होऊ शकतात. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही विधानसभेचे सदस्य नसताना मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे प्रियंकांना इलेक्शन न लढवताही मुख्यमंत्री होता येऊ शकते. त्यामुळे तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून पक्षाला काही लाभ मिळतो काय, हे पाहण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून केले जात आहेत, असेही मानले जाऊ लागले आहे.