नवी दिल्ली – महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून पुढे आलेली प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने आपल्या कारकिर्दीतील सर्वात सनसनाटी विजय नोंदवला. तिने येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार खेळाडू फुलराणी सायना नेहवालचा पराभव केला.
मालविकाने सायनाला 21-17, 21-19 असे सरळ दोन गेममध्ये अवघ्या 34 मिनिटांत पराभूत केले व स्पर्धेतील यंदाचा सर्वात धक्कादायक निकाल नोंदवला. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक जिंकलेल्या सायनाने यंदाच्या स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच दुखापतीतून बाहेर येत पहिल्या फेरीत विजय मिळवताना दुसरी फेरी गाठली होती.
मात्र, गुरुवारी झालेल्या या फेरीच्या सामन्यात मालविकाने सायनाला कडव्या लढतीनंतर पराभूत करताना आपलीच आयडॉल असलेल्या खेळाडूवरच मात केली. सायनाने या स्पर्धेद्वारे खूप मोठ्या कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले होते.
सिंधूची आगेकूच
भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनेही स्पर्धेत आगेकूच केली. तिने आपल्याच देशाच्या इरा शर्माचा दुसऱ्या फेरीत 21-10, 21-10 असा पराभव केला.