टोकियो – टोकियोत सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या एकेरीत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. तिला या स्पर्धेत थायलंडच्या बुसानन ओग्बामुनफान हिच्याकडून 17-21, 21-16, 13-21 असा पराभव पत्करावा लागला.
या पराभवामुळे महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपूष्टात आले आहे. दरम्यान, भारताच्या ध्रुव कपिला व एमआर अर्जुन या जोडीने पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी उपउपांत्यपूर्व लढतीत सिंगापूरच्या लेरी ही व लोह हीन जोडीवर 18-21, 21-15, 21-16 असा विजय प्राप्त केला.
अन्य लढचीच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने डेन्मार्कच्या जेपा बे व लॅसी मोल्हेद जोडीचा 21-12, 21-10 असा पराभव केला.
प्रणोयची लक्ष्यवर मात
भारताचा स्टार खेळाडू एच. एस. प्रणोय याने स्पर्धेतील सर्वात सनसनाटी निकाल नोंदवताना लक्ष्य सेनचाच पराभव केला. प्रणोयने बुधवारी जपानचा दुसरा मानांकित केंटो मोमोटा याचा पराभव करत धक्कादायक कामगिरी केली होती. गुरुवारीही त्याने याचीच पुनरावृत्ती करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता असलेल्या लक्ष्यवर 17-21, 21-16, 21-17 अशी मात केली.