केपटाऊन – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटीत संघात थाटात परतला. त्याने केलेल्या खेळीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 223 अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली. पहिल्या दिवशीच भारताचा पहिला डाव संपला व दिवसअखेर यजमान दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 1 गडी गमावून 17 धावा केल्या आहेत.
कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चांगलाच अंगलट आला. लोकेश राहुल व मयंक आग्रवाल हे सलामीवीर स्वस्तात परतल्यावर चेतेश्वर पुजाराने कोहलीला चांगली साथ दिली. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, पुन्हा एखदा स्थिरावल्यावर पुजारा धावांच्या चाळीशीत बाद झाला.
कोहलीने एका बाजूने नेटाने फलंदाजी केली. मात्र, टीकेचा धनी होत असलेला अजिंक्य रहाणे याने निराशाच केली. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 27 तर, शार्दुल ठाकूरने 12 धावांची खेळी करत कोहलीच्या साथीने संघाला किमान द्विशतकी धावांचा पल्ला पार करुन दिला. कोहलीने तब्बल दोन वर्षांनंतर शतकाची आशा निर्माण केली होती. मात्र, ती फोल ठरली. त्याने अर्धशतक साकार करताना 79 धावांची खेळी केली.
कोहलीला आपली मुलगी वामिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी शतकी भेट देण्यात मात्र अपयश आले. कोहली बाद झाल्यानंतर भारताचा पहिला डाव 223 धावात संपला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 4 तर, मार्को जेन्सनने 3 गडी बाद केले.
दिवसातील अखेरची 8 षटके खेळताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली. या मालिकेत भरात असलेला कर्णधार व सलामीवीर डीन एल्गर जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. त्यानंतर एडन मार्करम व केशव महाराज यांनी आणखी नुकसान होऊ दिले नाही.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 77.3 षटकांत सर्वबाद 223 धावा. (विराट कोहली 79, चेतेश्वर पुजारा 43, ऋषभ पंत 27, शार्दुल ठाकूर 12, कागिसो रबाडा 4-73, मार्को जेन्सन 3-55). दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 8 षटकांत 1 बाद 17 धावा. (एडन मार्करम खेळत आहे 8, केशव महाराज खेळत आहे 6, जसप्रीत बुमराह 1-0).
कोहलीचा अनोखा विक्रम
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक अनोखा विक्रम साकार केला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात त्याने उपाहारापर्यंत नाबाद 15 धावांची खेळी केली. यामुळे त्याच्या दक्षिण आफ्रिकेत कसोटीत 626 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकले आहे. पहिल्या स्थानावर मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावावर 15 कसोटीत 28 डावात 1 हजार 161 धावा आहेत.
पंतचे पुन्हा ये रे माझ्या मागल्या
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला या कसोटीत केवळ कोणाच्या तरी शब्दामुळेच स्थान मिळाल्याचे स्पष्ट होत असताना त्याने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. सुरुवात थाटात करताना नेहमीप्रमाणे करताना स्लीपच्या डोक्यावरून चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात 27 धावांवर आपली विकेट फेकली. संघाला गरज असताना सातत्याने बेजबाबदार फलंदाजी करत पुन्हा एकदा तो टीकेचा धनी बनला आहे.