काबूल – अफगाणिस्तानमधील महिलांनी डोके झाकावे, असा फतवा तालिबानकडून जारी करण्यात आला आहे. या आशयाचे पोस्टर संपूर्ण काबूल शहरात लावण्यात आले आहेत. शहरातील कॅफे आणि दुकानांच्या बाहेर “डोक्यापासून पायापर्यंत झाकणारा बुरखा’ घालण्याचे आदेश असलेली पोस्टर लावण्यात आली आहेत.
शरीया कायद्यानुसार महिलांनी हिजाब परिधीन करणे गरजेचे आहे, असे या पोस्टरवर म्हटले आहे. महिलांवरील निर्बंध कठोर असणार नाहीत, असे तालिबानने प्रथमपासून म्हटले होते. मात्र थोडा काळ गेल्यानंतर तालिबानने महिलांवरील निर्बंध अधिकाधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे.
महिलांना बुरखा परिधान करण्याची सक्ती करण्याचा फतवा काढल्यामुळे तालिबानचा खरा चेहरा उघड झाला आहे, असे एका आंतरराष्ट्रीय वेबसाइटने म्हटले आहे.
तालिबानच्या या कट्टर भूमिकेमुळेच आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळू शकलेली नाही. मात्र मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष तालिबानने पूर्ण केले आहेत, असे तालिबानचा परदेश उपमंत्री शेर मोहंम्मद अब्बास स्टॅनेकझाय याने म्हटले आहे.
तालिबानने यापूर्वी महिलांसाठी असेच काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. महिलांच्या शिक्षणावर बंदी, लांब अंतराचा प्रवास एकटीने न करण्याचा नियम आणि महिलांच्या नोकरी करण्यावर निर्बंधांच्या स्वरुपात कडक नियम करुन महिलांचे स्वातंत्र्य संकुचित करण्यात आले आहे.