मुंबई – चित्रपटांमधील गंभीर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्या बालनचा आज वाढदिवस आहे. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाला. सातवीत शिकत असताना जेव्हा विद्या बालनने माधुरी दीक्षितला ‘तेजाब’ चित्रपटात नाचताना पाहिलं तेव्हा तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न मनात बाळगले. विद्याने वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल ‘हम पांच’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, परंतु विद्याला तिचे करिअर चित्रपटांमध्ये करायचे होते. याशिवाय मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रयत्न करूनही ती अपयशी ठरली.
पहिल्याच चित्रपटात मोहनलालसोबत काम करण्याची संधी मिळाली
जेव्हा विद्या बालन सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करत होती, तेव्हा तिला दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता मोहनलालसोबत मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, हा चित्रपट काही कारणास्तव रखडला आणि यासाठी विद्या बालनला जबाबदार धरण्यात आले. यावेळी तिला पनोती सुद्धा म्हटले गेले.
स्वतःच्या शरीराचा करू लागली तिरस्कार
विद्या बालनला एकेकाळी तिच्या शरीराचा खूप तिरस्कार होता. तिला तिच्या बॉडीसाठी एवढे ट्रोल करण्यात आले होती की तिला तिच्या शरीराचा तिरस्कार होऊ लागला. विद्याने सांगितले होते, मला स्वतःवरच संशय येऊ लागला होता. मी माझ्या शरीराशी प्रदीर्घ लढा दिला आहे. मला खूप राग यायचा आणि माझ्या शरीराचा तिरस्कारही वाटायचा. वजन कमी केल्यानंतरही माझ्या आयुष्यात अनेक वेळा मला असे वाटले की मला कोणीही पूर्णपणे स्वीकारले नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्वतःला बदलण्याची गरज नाही. लोकांच्या छोटय़ाशा विचारांना ती जबाबदार नसल्याचे विद्या सांगते.
विद्या ZeeTV च्या कॉमेडी शो ‘हम पांच’ मध्ये राधिका माथूरच्या भूमिकेत दिसली होती. पण तिला फारशी ओळख मिळाली नाही. यादरम्यान, तिला ‘परिणीता’ हा चित्रपट मिळाला, त्यानंतर सर्व काही बदलले. ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटांमधील तिचे वाढलेले वजन आणि विद्याच्या आउटफिटमुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. यामुळे विद्या इतकी निराश झाली की तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
साकारली अडल्ट अभिनेत्रीची भूमिका
2011 मध्ये आलेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटाने विद्याचे नशीबच बदलून टाकले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विद्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, द डर्टी पिक्चरमध्ये सिल्क स्मिताच्या भूमिकेत येणे माझ्यासाठी थोडे कठीण होते.आम्हा दोघांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न होते.