मुंबई – करोनाच्या साथीवेळी विविध क्षेत्रातील कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र या काळात महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येते. नोकरीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या अपना डॉट को या कंपनीने ही माहिती संकलित केली आहे. या माहितीनुसार 2021 मध्ये एकूण महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 430 टक्क्यांनी वाढले.
एकूण परिस्थिती पाहता 2022 मध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असल्यामुळे या महिला आता विविध क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
करोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये घरातून काम करण्याची पद्धत विकसित झाली आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी ही पद्धत तुलनेने अधिक उपयोगी पडत असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात आले. पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलोरसारख्या मोठ्या शहरांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण 56 टक्क्यांनी वाढले आहे.
तर छोट्या शहरांमध्ये ही संख्या अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. बॅक, ऑफिस, स्वागत कक्ष, शिक्षक, अकाउंटंट, प्रशासन, डेटा एन्ट्री इत्यादी क्षेत्रात महिला अधिक संख्येने आगेकूच करीत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर मालाचा पुरवठा, सेक्युरिटी गार्ड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिटनेस ट्रेनर, चालक अशा प्रकारच्या महिलासाठी तितक्याश्या सोयीच्या नसलेल्या पदासाठीही महिला उमेदवार वाढत आहेत.