जोहान्सबर्ग – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना येत्या 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने ही मालिका प्रेक्षकांविनाच होणार असल्याचे सांगत चाहत्यांचा हिरमोड केला आहे.
सेंच्युरियन येथे खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. दक्षिण आफ्रिका मंडळाने ओमायक्रॉनचे सावट असल्यामुळे तिकिटांची विक्रीही केलेली नाही.
या सामन्यासाठी केवळ दोन्ही संघ, दोन्ही देशांचे क्रिकेट मंडळ तसेच ठरावीक संख्येने सरकारी अधिकारी यांनाच मैदानावर जाण्याची परवानगी दिली जाईल.
दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 निर्बंधांमुळे दोन हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत ही परवानगी मागे घेतली गेली आहे. जर हे संकट कमी झाले तर या संदर्भात पुढील घोषणा करण्यात येईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी येथे सरावही सुरू केला आहे.
भारतीय संघ आठव्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. जगातील हा एकमेव देश आहे जिथे भारतीय संघ अजूनही कसोटी मालिका जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदा निश्चितच इतिहास रचेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे.