मुंबई : राज्यात करोनाच्या नव्या विषाणू ‘ओमायक्रॉन’ ने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात आणखी ८ रूग्ण ‘ओमायक्रॉन’ बाधित आढळून आल्याने राज्याची चिंता वाढली आहे. दरम्यान, आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर ३ रुग्ण सातारा येथे आणि १ रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
मुंबईतील चारही रूग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रूग्ण मुंबईतील आहे. इतर ३ रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा तर एकाने इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या विलगीकरणात आहेत.
हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्वजण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षाची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झालेले आहे.
पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षाच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षाखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
एकूण ४८ ओमायक्रॉन बाधितांमध्ये मुंबई – १८, पिंपरी चिंचवड -१०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा -३ , सातारा – ३, कल्याण डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलढाणा-१ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरार -१ अशी रूग्ण संख्या आहे. तर, यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.