नवी दिल्ली -लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकाऱ्यांची 9 हजार 362 पदे रिक्त आहेत. त्याशिवाय, त्या संरक्षण दलांमध्ये 1 लाख 13 हजार जवान आणि इतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी संबंधित माहिती राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. लष्करात 7 हजार 476 अधिकारी आणि 97 हजार 177 जवानांची कमतरता आहे. लष्करात सध्या 53 हजार 569 अधिकारी आणि 11 लाख 35 हजारहून अधिक जवान कार्यरत आहेत.
नौदलात 11 हजार 100 अधिकारी आणि 63 हजार 515 खलाशी रूजू आहेत. त्यांची अनुक्रमे 1 हजार 265 आणि 11 हजार 166 पदे रिक्त आहेत. हवाई दलात 12 हजारहून अधिक अधिकारी आणि 1 लाख 38 हजार कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्या दलात 621 अधिकाऱ्यांची आणि 4 हजार 850 कर्मचाऱ्यांची पदे भरली गेलेली नाहीत, असे त्यांनी सांगितले.