नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमकतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि संघावर कडाडून हल्ला करत आहेत. हिंदुत्ववादावरून राहुल गांधींनी नुकतीच मोदींवर टीका केली होती. तोच धागा पकडून योगगुरू रामदेव बाबा यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. मात्र यावेळी त्यांनी राहुल यांना संबोधून अपशब्दांचा वापर केला.
राजस्थानात झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी आपण हिंदू असून हिंदुत्ववादी नसल्याचं म्हटलं होतं. तसेच देशात खरे हिंदु राज्य आणायचे असेल तर हिंदुत्व-वाद्यांना सत्तेवरून हटवले पाहिजे. हे लोक खरे हिंदू नाहीत ते केवळ सत्तेचे भुकेले आहेत. सत्तेसाठी धर्माचा वापर करणारे आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
यावरून रामदेवबाबा म्हणाले की, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व एकच आहे. आता तुम्ही म्हणाल की व्यक्ती वेगळी आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे. ए बावळट, एवढं तरी वाचन करायला हवं, एवढं बावळट असून चालत नाही, असंही रामदेव बाबा राहुल गांधींनी संबोधून म्हणाले. हिंदू ही संस्कृती आहे आणि संस्कृतीची जाण हिंदुत्व आहे, असे रामदेव म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.