पुणे – देशभरात राज्य सरकारांच्या अखत्यारितील राज्य शिक्षण मंडळे, राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ, सीबीएसई, सीआयसीएसई अशा शिक्षण मंडळांशिवाय भारतीय शिक्षण मंडळ या बोर्डाची भर पडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रामदेव बाबा यांच्या भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेला देशव्यापी मान्यता दिली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर शिक्षण मंत्रालयाने भारतीय शिक्षण मंडळास मान्यता दिली असून, ही संस्था योगगुरू रामदेव बाबा यांची आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून हरिद्वार येथील भारतीय शिक्षण मंडळाचा राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळांमध्ये समावेश केल्याचे यूजीसी आणि एआयसीटीईच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर भारतीय विद्यापीठ महासंघाने (एआययू) शिक्षण मंडळाला देशभरातील शिक्षण मंडळांसह समकक्षता दिली आहे. तसेच देशातील नियमित शिक्षण मंडळ म्हणून मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा समकक्ष ठरवल्या आहेत.