नवी दिल्ली – नागरिकांवर झालेल्या गोळीबार प्रकरणात लष्कराच्या 21 व्या पॅरा स्पेशल फोर्सच्या जवानांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. सुरक्षा दलांनी केलेल्या या अमानुष कारवाईच्या निषेधार्थ अनेक संघटना अद्याप बंदचे आवाहन करत असल्याने वातावरणात तणाव कायम आहे. मोन शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून अद्याप नागरिकांमध्ये या घटनेने अस्वस्थता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोनयाक युनियन या स्थानिक आदिवासींच्या शिखर संघटनेने गोळीबारांच्या वेगवेगळ्या घटनांत 17 जण मरण पावल्याचा दावा सुरवातीला केला होता. मात्र नंतर त्यांनी ही संख्या 14 असल्याचे निवेदन काढले. पोलीस तपासातही 14 नागरिक मरण पावल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोळसा खाणीतून परतणाऱ्या मजुरांच्या पिक अप व्हॅनवर लष्करी जवानांनी नजरचुकीने गोळीबार केला होता. त्यात सहा जण मरण पावले होते. हे मजूर घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना ही घटना उघडकीस आली. त्यांनी लष्करी वाहने आणि छावणीला घेरले. त्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान मरण पावला. त्यांनी लष्कराची वाहनेही पेटवून दिली.
यावेळी लष्कराने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आणखी सात नागरिक मरण पावले. त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा दंगलीला सुरवात झाली. जमावाने कोनयाक युनियन आणि असाम रायफलच्या छावणीची नासधुस केली. छावणीचा काही भाग पेटवून देण्यात आला होता. नागालॅंड पोलिसांनी स्वत:हून लष्कराविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
तिझोत पोलीश ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआर प्रमाणे, डिसेंबर चार रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास कोळसा खाण मजूर वाहनातून परत येत होते. अप्पर टिरू आणि ओटिंग यांच्या दरम्यान लोंगखाव येथे पोहोचल्यानंतर सुरक्षा दलांनी कोणतीही शहानिशा न करता गोळीबार केला. त्यात अनेक ग्रामस्थांचा मृत्यू झाला, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
नागरिक संतप्त
यातील दोषींविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन सामाजिक संघटना आणि आदिवासींच्या संघटनांनी बंदची हाक दिली. त्यानुसार सोमवारी नागालॅंडच्या अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. नागा स्टुडंट्स फेडरेशन या प्रभावशाली संघटनेने पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणत्याही उत्सवात सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या 28 जणांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.