नवी दिल्ली – पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने सोमवारी विविध समित्यांची स्थापना केली. त्या समित्यांची सुत्रे अजय माकन, सुनील जाखड, अंबिका सोनी, प्रतापसिंग बाजवा या ज्येष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.
संभाव्य उमेदवारांची छाननी करणाऱ्या समितीचे नेतृत्व माकन करतील. त्या समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, पक्षाचे प्रभारी हरीष चौधरी, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी प्रदेशाध्यक्ष जाखड यांचा समावेश आहे. जाखड यांच्यावर प्रचार समितीच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोनी यांना समन्वय समितीचे, तर बाजवा यांना जाहीरनामा समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. पंजाबमधील निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्या राज्याची सत्ता राखण्याचे आव्हान कॉंग्रेसपुढे आहे.
त्यासाठी आप, शिरोमणी अकाली दल, भाजप या पक्षांशी कॉंग्रेसला लढावे लागणार आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक कॉंग्रेस या नव्या पक्षाची केलेली स्थापना कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवणारी आहे. अमरिंदर भाजपशी आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.