आळंदी – श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे 1970 – 71 मधील एस.एस.सी. बॅचचे सर्व माजी विद्यार्थी तब्बल 51 वर्षांनी एकत्र आले. त्यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मिलन मंगल कार्यालय वडगाव रोड येथे संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यासाठी चाळीस माजी विद्यार्थी एकत्र आले होते. स्नेह मेळाव्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस भेट दिली.
याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे व डी. डी. भोसले पाटील, सदस्य अनिल वडगावकर, विठ्ठल महादेव घुंडरे (सदस्य), नारायण किसन गावडे, चंद्रकांत देशमुख, धरमचंद लोढा, मोतीलाल लोढा, बाळासाहेब पोफळे, पांडुरंग फाकटकर, नंदकुमार गोडसे, अनिल कवडे, अरुण तुर्की, किरण लोढा, मोतीराम थोरवे, जगन्नाथ सोलंकर, अर्जुन वाघमारे, ज्ञानेश्वर संत, तुकाराम वहिले (पंचायत समिती सदस्य), दिलीप खेडकर, नारायण भोर, शिवाजी दिंडाळ, मुक्तासंत, मालती थोरवे, शैला साबळे, जुनियर कॉलेज प्रमुख श्रीधर घुंडरे, सूर्यकांत खुडे आदी उपस्थित होते. संस्थेच्या विकास कामासाठी माजी विद्यार्थी नारायण गावडे यांनी 51 हजार रुपये व चंद्रकांत देशमुख यांनी 25 हजार रुपयांची वैयक्तिक देणगी घोषित केली. धरमचंद लोढा यांनी 1970 – 71 च्या बॅचच्या वतीने एक वर्ग खोली बांधून देण्याचे घोषित केले.
श्री ज्ञानेश्वर विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत
जीवनाचा पाया असणाऱ्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा गेली पावणेदोन वर्ष बंद होत्या. शासन आदेशानुसार व करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेने पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, लेखन साहित्याचे वाटप करून व पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात सोमवारी (दि. 6) स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सर्व प्रथम विद्यार्थ्यांचे शाब्दिक स्वागत करून वैशाली शेळके यांनी करोनाचे सर्व नियम सहज सोप्या शब्दात सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यपक प्रदीप काळे यांनी स्वागत समारंभासाठी उपस्थित असलेले श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.सुरेखाताई लोहोर व संघाचे सर्व प्रतिनिधी, लातूर मधील जि.प.शाळा सावरगाव शाळेचे मुख्याध्यापक शेख यांचा परिचय करून स्वागत केले व सुरू झालेली शाळा पुन्हा कधीही बंद होऊ नये, अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. पिंपरी-चिंचवड लायन्स क्लबचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा काळे, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.