आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी 725 वा संजीवन समाधी सोहळा संपवून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगरायांच्या पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. यावेळी वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात रांगोळीच्या पायघड्या, पुष्पसजावटीसह हरिनाम गजरात सोहळ्याचे परतीचे प्रवासात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी पालखी सोहळ्याचे परंपरेने स्वागत केले.
याप्रसंगी श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. नामदेव महाराज वासकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज बुरांडे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक ह.भ.प बाळासाहेब आरफळकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, दिघी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर गुळूंजकर यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुछा, उपरणे देवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, काशिनाथ तापकीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथा परंपरांचे पालन करीत पंढरपूर येथून पांडुरंगरायांच्या पादुका पालखी सोहळ्यातून आळंदी कार्तिकी एकादशीला समाधी सोहळ्यासाठी माउलींच्या भेटीला येतात. दरम्यान, आळंदी ते पंढरपूर पायी वारी पादुका पालखी सोहळा उरकून परतीचा प्रवास पादुका पालखी सोहळ्याने सुरू केला.
पहिला मुक्काम श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात झाला. यावेळी ट्रस्टच्या वतीने उपस्थित मान्यवराचे स्वागत व सत्कार मंदिरात करण्यात आला. यानिमित्त अनेक भाविक वारकरी दिंडेकरी टाळकरी विणेकरी पालखी मुक्कामी येथे विसवले होते. परिसरातील नागरिक, भाविक यांनी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्यातील वैभवी पादुकांची पूजा करून पादुकाना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आले. श्रींची आरती हरिनाम गजरात झाली. श्रीना महानेवैद्य वाढविण्यात आला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, काशिनाथ तापकीर यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी भाविक व वारकरी यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.