पुणे – दोन आठवड्यांपूर्वी झांबियातून पुण्यात आलेल्या 60 वर्षीय नागरिकास करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागील महिन्यात परदेशातून पुण्यात आलेल्या 393 विमान प्रवाशांपैकी सुमारे 170 जणांचे नमुने संकलित करण्यात आले असून त्यातील 40 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत तसेच त्यातील एकालाही करोनाची बाधा झालेली नाही. बाधित व्यक्तीची प्रकृतीही स्थिर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन शहरात येणाऱ्या विमान प्रवाशांवर लक्ष ठेऊन आहे. राज्य शासनाकडूनही या प्रवाशांची यादी महापालिकेस देण्यात येत आहे. त्यानुसार मागील आठवड्यात झांबियामधून आलेल्या एका व्यापारी प्रवाशास करोनासदृश लक्षणे असल्याने महापालिकेने त्याचे नमुने घेतले होते. हा रुग्ण करोना बाधित आढळल्यानंतर महापालिकेकडून तातडीनं उपाययोजना करत या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची करोना चाचणी केली होती. तसेच त्यांना विलगीकरणात ठेवत या रुग्णाचे नमुने जिमोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले होते.
पुणे सोडलेल्यांचे नमुने घेणे अशक्य
राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी महापालिकेस पुण्यात परदेशातून आलेल्या सुमारे 393 जणांची यादी देण्यात आली होती. हे सर्व मागील महिनाभरात पुण्यात आलेले आहेत. शिवाय, अनेक जण कामानिमित्ताने पुण्यात काही दिवसांसाठी आले होते. ते पुण्याबाहेर गेलेले असून अनेक जण परदेशातून पुण्यात येऊन पुन्हा परदेशात गेलेले आहेत. त्यामुळे, अशा व्यक्तींशी संपर्क झाला असला तरी ते पुण्यातून बाहेर गेल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी घेता येणार नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.