पुणे – परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांसह देशांतर्गत प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर आल्यानंतर करोना चाचणी करण्यात येत आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. केंद्र तसेच राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार या चाचण्या करण्यात येत आहेत.
ओमायक्रॉन हा करोनाचा वेगाने पसरणारा व्हेरिएंट असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रासह, राज्यशासनाकडूनही कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासह नव्याने येणाऱ्या प्रवाशांचीही आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत देशातर्गंत प्रवाशांना लस प्रमाणपत्र असल्यास ही चाचणी करावी लागत नव्हती.
मात्र, आता नव्या नियमांनुसार देशांतर्गत विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांनाही करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याची सुविधा विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अशा प्रवाशांना अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहणे सक्तीचे आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.