पुणे – “हेअर ट्रान्सप्लांट’चे तज्ञ डॉक्टर आहोत, असे भासवून कुठलीही वैद्यकीय डिग्री, परवाना नसताना विमाननगर भागात हेअर ट्रान्सप्लांट केंद्र सुरू केलेल्या बोगस डॉक्टरांच्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
त्यांनी शंभरपेक्षा अधिक नागरिकांचे हेअर ट्रान्सप्लांट केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, त्यांच्या क्लिनिकमध्ये 200 नागरिकांचे रजिस्टेशनही आढळले आहे. शाहरूख हैदर शाह (रा. वडगावशेरी), पंचशिला काशिनाथ रोडगे (रा. रामवाडी), चैताली भरत म्हस्के (रा. वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पालिकेच्या ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शह याने विमाननगर भागातील दत्त मंदिर चौकात “डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट’ नावाने सेंटर सुरू केले होते. केश प्रत्यारोपणासाठी तो 20 ते 25 हजार रुपये घेत होता. या बोगस सेंटरची माहिती युनिट चारचे हवालदार नागेशिंसग कुंवर यांना मिळाली. यानुसार महापालिकेचे बोगस डॉक्टर कारवाई समिती आणि गुन्हे शाखेच्या पथकाने शाह यांच्या सेंटरवर छापा टाकला.
एखाद्या रुग्णालयात ऑपरेशन थिएटर सुरू करण्यासाठी पालिकेची नोंदणी बंधनकारक असते. शाह याने कोणतीही नोंदणी केलेली नव्हती, त्याच्याकडे काम करणाऱ्या दोन महिलांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तर, शाह याचे बीएसी पर्यंत शिक्षण झाल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक शोभा क्षिरसागर, उपनिरीक्षक जयदीप पाटील, अंमलदार महेंद्र पवार, संजय आढारी आदींनी केली.
तो होता कंपाउंडर…
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनूसार शाह एका हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून कामाला होता. तर त्याची दुसरी दहावी पास सहकारीही एका डॉक्टरच्या हाताखाली कामाला होती. यामुळे त्याला हेअर ट्रांन्सप्लांटची थोडीफार कल्पना होती, त्याच्या क्लिनिकमध्ये भूलीची इंजेक्शन आणि सर्जरीचा साइट इफेक्ट होऊ नये म्हणून देण्याची औषधेही सापडली आहेत. आता, पोलीस रुग्णांशी संपर्क साधून सर्जरी बद्दल माहिती घेत आहेत.
“कुठलीही वैद्यकीय डीग्री, परवाना नसताना हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यांनी आजवर अनेक नागरिकांचे हेअर ट्रान्सप्लांट केले आहेत. क्लिनीकमधून काही औषधे मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.”
– जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक, युनिट चार