मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर येथे मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी एकरी 115 टन विक्रमी ऊस उत्पादन घेतले असून, एका बुडास 22 उसाचे फुटवे, असून 55-56 कांड्या ऊस असलेल्या एका उसाचे वजन पाच किलोपर्यंत आहे. परिसरात या उसाच्या विक्रमी फडाची चर्चा असून हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
नागापूर परिसरातील शेतजमीन शेतीपिकांना पूरक आहे. त्यास जिद्द, नियोजन व मेहनतीची जोड देत सभापती देवदत्त निकम व त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन करणारे धनेश निघुट यांनी ऊस पिकाची शेतात नियोजन पद्धतीने लागवड करून एकरी 115 टनांचे विक्रमी उत्पन्न काढले. सुरुवातीस शेतीची पूर्ण मशागत करून ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये जुन्या उसाची पाचट कुट्टी करून, तागाचे पीक घेऊन ताग गाडला. शेणखत कंपोस्ट खताचा वापर करून ऊस बेणक फुले-265 या जातीची लागवड करण्यात आली. सरी पद्धतीने पाच बाय पाच अंतरावर दोन डोळे, ऊस बेण्याची लागवड केली होती. ऊस पिकांच्या उगवणीनंतर 20 ते 25 दिवस रासायनिक खताचा पहिला डोस वापरण्यात आला. यामध्ये दोन डीएपी, एक पोटॅश, 25 किलो युरिया, बेरोकॉल 11-15 किलो, सॅटराईड एक बॅग 50 किलो याप्रमाणे टाकण्यात आला.
दर दहा दिवसांनी पाणी नियोजन ठिबक सिंचनाद्वारे देण्यात आले. उसावरील कीड, माशी, पांढरी माशी या रोगापासून नियंत्रणासाठी दीड महिन्याच्या कालावधीनंतर औषधी फवारणी करण्यात आली होती. 60 दिवसांच्या अंतरावर ठिबकद्वारे दोन बॅग युरिया, दोन बॅग पोटॅश टाकण्यात आला.
वसंत ऊर्जा, मायक्रोन्युटी, या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या औषधाची पाण्यात मिसळून दुसरी फवारणी, अशा सहा फवारण्या करण्यात आल्या. 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उसास एकरी दोन डीएपी, एक पोटॅश,पंचवीस किलो बेरोकॉल 11, सॅटराईट एक बॅग रासायनिक खत वापरण्यात आला.