पवनानगर – करोनाच्या पार्श्वभूमीमुळे दिंडी सोहळा झाला नव्हता; परंतु यावर्षी करोना कमी झाल्यामुळे पवना शिक्षण संकुलात उत्पत्ती एकादशी दिवशी हरिनामाच्या जयघोषात टाळ-मृदुगांच्या तालात पवना शिक्षण संस्थेचा परिसर दुमदुमून गेला होता.
या दिंडी सोहळ्याने पवना शाळेला भक्तीमय वातावरणामुळे आळंदीचे स्वरूप आले होते. या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱयांची वेशभूषा करून या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई या संताच्या वेशभूषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच हभप प्रवचनकार बाळासाहेब बोरुडे यांची यावेळी प्रवचनरुपी सेवा संपन्न झाली. तसेच यावर्षी प्रथमताच या दिंडीमध्ये जलदिंडी, वृक्षदिंडी, ग्रंथ दिंडी, आरोग्य दिंडी ही शाळेत काढण्यात आली.
सकाळी आठ वाजता डॉ. संजय चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक माऊलींच्या प्रतिमा व पालखी पूजन करण्यात आले. तसेच हभप बाळासाहेब बोरुडे यांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले. यावेळी काले-पवनानगर सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच अमित कुंभार प्राचार्या अंजली दौंडे, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, गणेश ठाकर ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण, सदस्या आशा कालेकर, छाया कालेकर, रंजना कालेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर होजगे, राजेश राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी ओंकार पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्ता कालेकर, सज्जन बोहरा व मार्च 1999-2000 बॅचच्या वतीने फलोअल्पपोहार सर्व वारकारी विद्यार्थांना देण्यात आले.
दिंडी सोहळ्याचे आयोजन संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे व संजय हुलावळे, राजकुमार वरघडे यांच्या सहकार्याने पवना शिक्षण संकुलातील सर्व अध्यापक, अध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले होते.प्रास्ताविक अंजली दौंडे यांनी केले. सूत्रसंचालन भारत काळे यांनी केले. महादेव ढाकणे यांनी आभार मानले.