बीड – बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल जिल्ह्यातील नेकनूरमध्ये एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
रूपाली मुळे (वय -16 रा. नेकनूर) व कोमल गोविंद गायकवाड (वय 16 रा. मस्साजोग) अशी आत्महत्या केलेल्या मुलींची नावे आहेत. या मुलींनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुले-मुलींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या वाढत्या घटना पालकांसाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत. मोबाईलमुळे मुले घरच्यांपेक्षा व्हर्चुअली बाहेरील लोकांसोबत जास्त जोडलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेमके काय सुरु आहे हे लक्षात येत नाही. पालकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायला हवी, असे एका अहवालात सांगण्यात आले आहे.