अहमदनगर – महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार
सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, काल (दि. 6) रात्री उशिरा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना स्थळी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेते सुद्धा उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी आमदार जगताप व त्यांच्या स्वीय सहायक यांनी दुर्घटनेवेळी केलेल्या मदत कार्याचे सुरुवातीला कौतुक केले.
तसेच, आगीची झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर लवकरात लवकर कारवाई होईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अतिदक्षता विभागात ही आग पीएम केअर फंडातुन मिळालेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन लागली आहे, असा संशय व्यक्त केला होता . त्यावर देखील पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं.
“या व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावर आत्ताच भाष्य करणे योग्य नसून, चौकशी समितीच्या निष्कर्षानंतर मत व्यक्त करायला हवे.” असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी म्हणत आमदार रोहित पवार यांचे कान टोचले आहेत.