बंगलुरू – कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते पुनीत राजकुमार यांच्यावर आज रविवारी सकाळी कांतीरवा स्टुडिओत पुर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आई वडिलांवरही तेथेच अंत्य संस्कार करण्यात आले होते.
कन्नड मधील लिजंडरी अभिनेते दिवंगत डॉ राजकुमार यांच्या पाच मुलांपैकी पुनीत हे एक होते. त्यांचे शुक्रवारी हदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून साऱ्या कर्नाटकात त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. त्यांचा मृतदेह कांतीरवा स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या दोन दिवसांत अक्षरश त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
Karnataka: The last rites of Kannada actor #PuneethRajkumar were performed at Sree Kanteerava Studios in Bengaluru today with state honours. pic.twitter.com/mzk5m9GoBR
— ANI (@ANI) October 31, 2021
आज पहाटे साडे पाच वाजता कांतीरवा स्टेडियमवरून त्यांची अंत्ययात्रा सुरू करण्यात आली. तेथून ती 13 किमी अंतरावरील कांतीरवा स्टुडिओत नेण्यात आली. सकाळी दहा वाजता त्यांच्यावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते पण त्याच्या खूप आधीच म्हणजे सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
यावेळी मुख्यमंत्री बसरवराज बोम्माई यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकारी तेथे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, सिद्धरामैय्या, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या अनेक मान्यवर व अभिनेते व चित्रपटसृष्टीतील दिग्गज यावेळी उपस्थित होते.