मुंबई – क्रुझ वरील ड्रग पार्टीच्या कारणावरून आर्यन खान याच्या बरोबर अटक करण्यात आलेली फॅशन मॉडेल मुनमुन धामेचा हिची आज भायखळाच्या महिला कारागृहातून सुटका झाली. गेल्या गुरूवारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खान आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना जामीन दिला होता. त्याचवेळी तिलाही जामीन देण्यात आला होता. आर्यन प्रमाणेच तिच्यावरही एकूण चौदा अटी घालण्यात आल्या आहेत.
तिच्या सुटकेची औपचारीकता आज पुर्ण करण्यात आल्यानंतर आज तिची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील जामीन मंजुर झालेला अरबाज मर्चंट याची मात्र अजून ऑर्थररोड कारागृहातून सुटका झालेली नाही. आर्यन, मर्चंट आणि धामेचा यांना जामीन मंजुर करताना त्यांना प्रत्येक शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई ऑफिस मध्ये सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत हजेरी देण्यास सांगण्यात आले आहे.