कोथरूड – आपल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबत पाठपुरावा केला तर निवडणूक जिंकणे अवघड नाही. आगामी निवडणुका सोप्या नाहीत हे विरोधकांना माहिती आहे. छोटे पवार कमी पडल्यामुळे मोठ्या पवारांना निवडणुकीत उतरावे लागले, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पटील यांनी लगावला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील यांच्या “फोटोबायोग्राफी’चे प्रकाशन उपस्थित लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुनीत जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रकाश जावडेकर म्हणाले की, 2019ची विधानसभा निवडणूक आपण पराभूत नाही तर विजयी झालो. मात्र, शिवसेनेने गद्दारी केली आणि विरोधकांशी हातमिळवून केली.
जगदीश मुळीक म्हणाले की, या पुस्तकातून चंद्रकांत पाटील यांचा 45 वर्षांचा संघर्ष उलघडतो. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले व्यक्तिमत्त्व आज राज्याचे प्रमुख आहेत, साधी राहणी आणि उच्च विचारणसणी हीच त्यांची ओळख आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, करोनाकाळात दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण काय केले पाहिजे, यावर त्यांनी अधिक भर देत कामाला सुरुवात केली. संवेदनशील मनाचा नेता, संघटनेमध्ये सूक्ष्म नियोजन, संकटाच्या काळात मदतीला धावणारे असे दादांचे नेतृत्व आहे. संदीप खर्डेकर म्हणाले की, दादांनी जो संघर्ष केला त्याची ही फोटोबायोग्राफी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात संघ जीवन जगताना, या कार्याचे संकलन करणे अवघड होते. संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी आभार मानले.