काबूल – अफगाणिस्तानमध्ये निर्माण जालेल्या प्रचंड अन्नटंचाईमुळे तालिबानने आता श्रमांच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याऐवजी गहू द्यायला सुरूवात केली आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिुल्ला मुजाहिदीन याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही योजना अफगाणिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत एकट्या काबूलमध्ये 40 हजार जणांना रोजगार देण्यात येणार आहे. प्रचंड वाढलेल्या बेरोजगारीला नियंत्रित करण्यासाठी हजारो बेरोजगार तरुणांना या योजनेतून आर्थिक मोबदल्याऐवजी गव्हाच्या स्वरुपात मोबदला दिला जाणार आहे. या मजूरांनी कष्ट केलेच पाहिजेत, अशी सक्तीही या योजनेत करण्यात आली असल्याचे झबिउल्ला मुजाहिदीनने म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील 1 कोटी 90 लाख नागरिकांना सध्या प्रचंड अन्नटंचाईचा सामना करावा लागतो आहे, असे संयुक्त राष्ट्रातील एका अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या हंगामानंतरच्या दोन महिन्यात अन्नधान्याची महागाई 30 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षी नोव्हेबरपासून पुढील वर्षी मार्चपर्यंत अफगाणिस्तानमधील निम्म्यापेक्षा अधिक जनतेला प्रचंड अन्नटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानला एका सामुहिक आपत्तीमध्ये ढकलले जाऊ शकत नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित योगदान देणे गरजेचे आहे, असे जागतिक अन्न कार्यक्रमाने एका निवेदनात म्हटले आहे.