पिंपरी – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्या वतीने चिंचवड परिसरात पाइपद्वारे गॅस वितरणास सोमवारपासून (दि. 25) सुरवात करण्यात आली. नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी या योजनेचे उद्घाटन केले.
“एलपीजी’च्या तुलनेत अगदी स्वस्त असलेल्या “एमएनजीएल’च्या वतीने शहराच्या विविध भागात पाइपद्वारे गॅस पुरवठा केला जातो. चिंचवडगाव परिसरातही या योजनेसाठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ लिंक रोड, चिंचवड येथील संत गार्डन आणि भक्ती पॅरेडाइज या सोसायट्यांपासून करण्यात आला. नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “एमएनजीएल’चे अधिकारी नितीन पाटील, दोन्ही सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात संत गार्डन या सोसायटीमधील 90 फ्लॅट आणि भक्ती पॅरेडाइजमधील 30 फ्लॅटला पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्यास सुरवात झाली आहे. “एमएनजीएल’ची गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या सोसायटीची एनओसी द्यावी, असे आवाहन नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी केले आहे.
सध्या एलपीजी गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत आहे. पाइपद्वारे होणारा गॅस पुरवठा हा तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित असल्याने या सोसायट्यांमधील गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच आसपासच्या इतर सोसायट्यांनी आमच्याकडे लवकरात लवकर पाइपद्वारे गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे.