मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी मागील काही दिवसांपासून झडत आहेत. मात्र एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच मलिक यांनी एक सर्टिफीकेट ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
मलिक यांनी ट्विट करत समीर दाऊद वानखेडे यांचा फ्रॉड इथून सुरू होतो असं म्हटलेय. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचं जन्माचं प्रमाणपत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. यामध्ये वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद के वानखेडे असं असल्याचं दिसत आहे. तर त्यांच्या आईचं नाव झहीदा असल्याचं यामध्ये दिसत आहे. तसेच समीर हे जन्मापासून आतापर्यंत मुस्लीमच आहे, असंही मलिक यांनी नमूद केलं.
मलिक म्हणाले की, मी समीर वानखेडेचे अनेक विषय समोर आणले. मात्र त्यांच्याकडून राजकीय आरोप होत असल्याचं म्हटलं आहे. भाजपवाले वानखेडेवरून हिंदू-मुस्लीम मुद्दा समोर करत आहेत. मात्र वानखेडे हे मुस्लीमच आहेत. त्यांचं जन्माचं प्रमाणपत्र मी प्रसिद्ध केलं. त्यात हे स्पष्ट दिसून येत.
दरम्यान समीर वानखे़डेचे वडिल दाउद वानखेडेंनी धर्मांतर करून जातीचा बोगस दाखला काढला. त्यात खाडोखोड केली. इथुनच सगळी बोगसगिरी सुरू झाली. बोगस सर्टिफीकेट काढूनच समीर वानखेडेंने IRS ची नोकरी मिळवली. वानखेडे हा बोगस असून त्यांनी मुंबईतून शेकडो कोटी रुपये उकळल्याचा आरोपही मलिक यांनी केलाय.