वॉशिंग्टन – तैवान व चीन यांच्यातील तणाव पाहता चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानच्या बचावासाठी पुढाकार घेईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानचे संरक्षण करेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना बायडेन म्हणाले, होय. आम्ही तैवानचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. बायडेन यांच्या या वक्तव्याचे तैवानने स्वागत केले आहे. तैवान राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते जेव्हियर चांग म्हणाले, अमेरिकेतील सरकारने वास्तविक कार्याच्या माध्यमातून तैवानसाठी ठोस समर्थनाची भूमिका घेतली आहे. चीनपासून संरक्षण करण्यासाठी तैवानने आंतरराष्ट्रीय आघाडी बळकट करण्यावर भर दिला आहे.
अमेरिकेचे लष्कर तैवानच्या सेनेला गुप्त स्वरूपात लष्करी प्रशिक्षण देत आहे. हे प्रशिक्षण गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. चीनकडून धोका वाढला आहे. अमेरिकेकडे लवकरात लवकर एफ-१६ लढाऊ विमानांची डिलिव्हरी करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये तैवानने अमेरिकेकडून एफ-१६ लढाऊ जेट खरेदी करण्याचा सौदा केला होता. त्याची पूर्तता १० वर्षांत अपेक्षित आहे.
बायडेन यांच्या वक्तव्यानंतर संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत जेंग जून म्हणाले, अमेरिकेने कोणतीही धोकादायक कृती करण्याच्या आधी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. परिणामांचाही विचार करावा. चीनने पुन्हा एकदा तैवानबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी तैवानी परराष्ट्र मंत्र्यांच्या युरोप दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे.
द्विपक्षीय संबंधातील राजकीय पाया डळमळीत करू नका, असे आवाहन वांग यांनी युरोपीय देशांना केले आहे. युरोपीय देशांनी तैवानसोबत संबंध निर्माण करताना सतर्कता बाळगली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत सुमारे २०० चिनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली. तैवान संरक्षण मंत्रालयानुसार चिनी लढाऊ विमानांद्वारे ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत नऊवेळा चिनी विमानांनी घुसखोरी केली.