अहमदनगर: गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका; राज्य सरकारवर साधला निशाणा
सरकारमधील व्यक्तींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त
पारनेर –
राज्यातील सरकारच्या भूमिकेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज प्रश्नचिन्ह निर्माण केले. पारनेर तालुक्‍यातील जवळे या ठिकाणी सोळा वर्षीय मुलीच्या संशयास्पद हत्येबाबत हजारे यांनी सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवरच प्रश्‍नचिन्ह उभे करुन चिंता व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.

अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी संवाद केला. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही त्यांनी प्रथमच टीका केली. राज्याच्या गृहमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीच जर भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात सापडत असतील, तर ते गुन्हेगारांवर धाक काय रहाणार? महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्यानेच असे प्रकार होत असल्याचे सांगत येत्या अधिवेशनात यावर कठोर कायदा करा, अशी सूचनाही हजारे यांनी केली आहे. दरम्यान, गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, असेही मत अण्णांनी स्पष्ट केले. गुन्हेगार शोधून त्यांना तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अण्णांनी यावेळी केली. तसेच ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखायची तेच भ्रष्टाचाराचे आरोपात अडकले आहेत, यावर खेद व्यक्त केला.

महिलांवरील अत्याचार वाढण्यामागे हे पण एक कारण आहे, असे ते म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव न घेता त्यांच्यावर अण्णांनी ही टीका केली. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दीड वर्षांनंतर भरले, त्यावर अण्णांनी भूमिका मांडली. असल्या आयोगांनी काही फरक पडत नाही. देशात घटना सर्वोच्च आहे. घटनेनुसार कठोर कायदे करा आणि त्याची कडक अंमलबाजवणी करा, त्यानंतरच गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल. त्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिसांचा वचक दिसून येत नाही, त्यामुळे अशा दुर्दैवी घटना होत असल्याचे मत अण्णांनी यावेळी व्यक्त केले.

गुन्हेगारीवरही अण्णांनी व्यक्‍त केली चिंता…
अण्णा हजारे यांनी थेट पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत राज्यासह तालुक्‍यातील पोलीस प्रशासनाला टार्गेट केले आहे त्यामुळे तालुक्‍यातील पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हा अधीक्षकांनी तालुका पोलीस प्रशासनाला याबाबत गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

तालुक्‍यातील गुन्हेगारीबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने गुन्हे वाढत असल्याचे पारनेर तालुक्‍यातील या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.