पुणे : सरकार…आमचीही दखल घ्या; लोककलावंत परवानगीच्या प्रतीक्षेत

पुणे – राज्यभरात नाटक, चित्रपट आदी कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग शुक्रवारपासून खुला झाला. पण आम्ही अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेतच आहोत. सरकार आमची दखल घेत नाही. आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल करत, सरकारने परवानगी देण्याची मागणी लोककलावंत करत आहेत.

शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या लोककलेच्या सादरीकरणाला अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. मागील दीड वर्षांपासून उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्‍न आता लोककलावंतांसमोर निर्माण झाला आहे.

विविध कार्यक्रम, जत्रा आदींद्वारे लोककलावंत कला सादरीकरणातून प्रबोधन आणि मनोरंजन करतात. मात्र करोनामुळे लोककलावंतांच्या सादरीकरणावर अद्यापही पडदाच आहे. नृत्यकार, संगीतकार, शाहीर, वादक यांसह तांत्रिक कलावंत आदी हजारो कलाकार लोककलेवर अवलंबून आहेत. अनेक कलाकार पिढ्यानपिढ्या या क्षेत्रात असल्याने उदरनिर्वाह करण्याचे अल्प पर्याय त्यांच्यासमोर आहेत. कार्यक्रमांमधील सादरीकरणापेक्षा जत्रांमधून होणारी आर्थिक उलाढाल अधिक असते.

मात्र ऐन जत्रांच्या कालावधीत लॉकडाऊन असल्याने मोठा फटका या क्षेत्राला सहन करावा लागला. कलाकारांनी आजवर जमवलेले पैसे मागील दीड वर्षात खर्च होत आहेत. त्यामुळे आता अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. रोजच्या जगण्याबरोबरच सादरीकरणाचे साहित्य आणि वाद्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी होणारा खर्च देखील कलाकारांना करावा लागत आहे. त्यामुळे ही सगळी आर्थिक गणिते जुळवताना तारेवरची कसवत करावी लागत आहे.

करोनामुळे लोककलावंत उपेक्षित राहिले आहेत. मोलमजुरी करून त्यांना जगावे लागत आहे. सरकारदेखील या विषयावर बोलत नाही. आम्ही आतापर्यंत 14 पत्रे दिली. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील कलाकारांना बैठकांना बोलावले गेले. मात्र, आमच्या पत्राची दखल घेतली जात नाही. यात्रा सुरू नाहीत, आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. आमची घरे कशी चालणार? आम्हांला दिवाळीच्या आधी मदत मिळणे आवश्‍यक आहे. त्यानंतर मदत मिळाली, तर त्याचा उपयोगच होणार नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी मदत मिळणे आणि कार्यक्रमांना परवानगी मिळणे आवश्‍यक आहे.
– संभाजी जाधव, अध्यक्ष, मराठी तमाशा लोककलावंत परिषद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.