दौंड – डॉक्टरांना खरं तर देव मानले जाते, मात्र काही ठिकाणी डाॅक्टर रुग्णांकडून भरपूर पैसे उकळतात. तसेच अनेक वेळा डॉक्टरने रुग्णांना मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. असे काही डाॅक्टर वैद्यकीय पेशाला काळीमा फासतात. अशीच एक डाॅक्टरांनी रुग्णाला मारहाण केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे.
प्रसुतीच्या वेळी ओरडल्याने गरोदर महिलेला चापटांनी, बुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ही घटना यवत येथील हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपी डाॅक्टरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
माहितीनुसार, पूजा गोरख दळवी यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना यवत येथील हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रसुतीच्या कळांमुळे महिला ओरडत असल्याने डाॅक्टरने महिलेला शरीरावरील विविध भागावर बुक्क्यांनी, चापटांनी मारहाण केली. यात महिलेच्या चेहऱ्यावरील काही भाग काळा निळा झाला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. डाॅक्टरने केलेल्या अमानुष मारहाणीविरोधात महिलेने यवत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.