काबूल – काबूल शहरातील एका मशिदीच्या बाहेर आज दुपारी झालेल्या एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात काही जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. ईद गाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ हा बॉबस्फोट झाला, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिद याने ट्विटरवर म्हटले आहे.
हा स्फोट झाला तेंव्हा या मशिदीमध्ये विशेष प्रार्थनासभा सुरू होती.
झबिबुल्ला मुजाहिद याच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. त्यांच्यासाठी ही प्रार्थनासभा सुरू होती. झबिबुल्लाने शनिवारीच या प्रार्थनासभेसाठी सोशल मीडियावरुन सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या स्फोटापूर्वीच या ईद गाह मशिदीमधील प्रार्थनासभेसाठी तालिबानने मशिदीजवलील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
या स्फोटानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला, असे स्थानिक दुकानदाराने म्हटले आहे. एका आंतरराश्ट्रीय वृत्तसंस्थेच्या वार्ताहरांनीही बॉम्बस्फोटांनंतर गोळीबाराचे आवाज ऐकल्याचे म्हटले आहे. या स्फोटात किती जण ठार झाले आणि किती जण जखमी झाले हे त्वरित समजू शकलेले नाही. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र अलिकडेच जलालाबादेत झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला इस्लामिक स्टेटकडून केला गेला असल्याची शक्यता आहे.