श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये उरी भागात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ लष्कराने अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामध्ये 30 किलो अमली पदार्थ असून काळ्या बाजारात याची किमंमत अंदाजे 25 कोटी रुपये आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.
उत्र काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी भागात “एलओसी’जवळ तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा रक्षकांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. या भागाचा शोध घेतल्यानंतर येथे अमली पदार्थांचा साठा आढळून आला, असे बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक रईस मोहंम्मद भट यांनी सांगितले.
भारतीय हद्दीत या अमली पदार्थांची तस्करी करण्याचा तस्करांचा प्रयत्न होता. मात्र सुरक्षा दलांच्या हालचाली आढळून आल्यावर ते पळून गेले, असेही ते म्हणाले. पाकिस्तानी खुणा असलेल्या दोन पिशव्यांमध्ये असलेले 25-30 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.