अलीगड – देशात महिलांवरील अत्याचाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अश्लील व्हिडीओ बनवून महिलांचं शोषण करण्याच्या घटना घडत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. येथील महिला शिक्षिकेनेच वसतिगृहातील विद्यार्थींनींचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याचं उघड झालं आहे.
अलीगडच्या कस्तूरबा गांधी वसतिगृहातील शिक्षिकेनेच वसतिगृहातील मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवले. आता आरोपी शिक्षिका फरार झाली आहे. तर फरार शिक्षिकेने व्हिडीओ व्हायरल केल्यास बदनामी होईल, या भीतीने अनेक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली आहे.
अलीगडच्या मडराकमधील कस्तूरबा गांधी निवासी मुलींच्या वसतिगृहातील महिला शिक्षिकेने वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ बनवले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास तुमच्या कुटुंबियांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी शिक्षिकेने विद्यार्थिनींना दिली होती. आरोपी शिक्षकेचं नाव रुबी राठोड असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान काही मुलींच्या कुटुंबीयांना शिक्षिकेने केलेल्या कृत्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वसतिगृहात गोंधळ घातला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला. विज्ञान विषयाच्या शिक्षिका रुबी राठोड यांनी धमकावत आमचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली.
या प्रकरणी आतापर्यंत शिक्षिका रुबी राठोड, वसतिगृहाचा गेट कीपर आणि वॉर्डनविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर फरार रुबी राठोड यांचा पोलिस शोध घेत आहेत.