पिंपरी -सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. 1 ते 17 सप्टेंबर या कालावधीत 543 संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 100 जण बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या नऊ महिन्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले आहेत. तापाचे रुग्णही दीड हजारांपुढे जाऊन पोहचले आहेत.
सध्या पावसाळा सुरू आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आला असला तरीही डेंग्यू आजाराची साथ आहे. शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून संशयित रुग्ण सापडत होते. मात्र, जुलै महिन्यापासून डेंग्यूचे बाधित रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. जुलै महिन्यात 99 संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 6 जण बाधित झाले. तर, ऑगस्टमध्ये 358 संशयित रुग्णांपैकी 71 जण बाधित झाले. तुलनेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 543 सशंयित रुग्ण आढळले. त्यापैकी 100 रुग्ण बाधित झाले आहेत.
17 दिवसांत दीड हजारांपुढे तापाचे रुग्ण
जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत गेल्या साडेआठ महिन्यात 16 हजार 174 तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 3 हजार 689 इतके रुग्ण आढळले. तुलनेत जुलै महिन्यात 2 हजार 261 इतकेच रुग्ण होते. तर, सप्टेंबर महिन्यात 17 तारखेपर्यंत 1 हजार 706 तापाचे रुग्ण आढळले आहेत.
मलेरिया, चिकुनगुणियाची साथ आटोक्यात
मलेरिया आणि चिकुनगुणियाची साथ मात्र सध्या आटोक्यात आहे. जुलै महिन्यात मलेरियाचे 2 बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर मलेरियाचा आत्तापर्यंत एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. चिकुनगुणियाचे गेल्या नऊ महिन्यांमध्ये 84 संशयित रुग्ण आढळले. मात्र, त्यापैकी एकही रुग्ण बाधित झालेला नाही.