शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा पक्षाला “जय महाराष्ट्र’

पिंपरी  -पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये शिवसेनेला पहिला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व कामगार नेते अमोल कलाटे यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 जिल्हाप्रमुखांनेच पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर, खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थकांने पक्ष सोडल्याने आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबई येथे आज (दि. 22) चिंचवडे यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण चिंचवडे उपस्थित होते. गजानन चिंचवडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात कॉंग्रेस या पक्षातून झाली. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेमधून काम सुरू केले.

चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार बारणे यांचे कट्टर समर्थक आहेत. सन 2009 विधानसभा, सन 2014 लोकसभा आणि विधानसभा, सन 2019 लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत गजानन चिंचवडे यांच्याकडे शिवसेना पक्षाने प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती.

ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पडली. त्यांनी त्यांच्या परीने बेरजेचे राजकारण, समाजकारण करीत कार्यकर्ता जोडण्याचे काम केले. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी अनेक विधायक उपक्रम, नावीन्यपूर्ण अभियाने राबवले.

चिंचवडे यांच्या पत्नी शिवसेनेच्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मागील स्थायी समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लागणार होती. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना स्थायी समिती सदस्य पद देण्याचे नाकारले. त्याच नाराजीतून त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगे आगे देखो होता है क्‍या – ढाके
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. शहरामध्ये शिवसेनेला सद्यस्थितीत कोणी वाली नसल्याची परिस्थिती आहे. फेब्रुवारी 2022 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय पक्का असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आगे आगे देखो होता है क्‍या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.