पुणे- शहरातील नागरिकांना आमिष दाखवून किंवा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची ऑनलाइन लूट करण्याचे प्रकार सुरूच आहेत. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी दिल्लीजवळील नोयडा येथील ठगाला अटक केली आहे. तर, दुसऱ्या एका प्रकरणात सिमकार्डची माहिती अद्यायावत करण्याचे सांगत लुटण्यात आले आहे.
दहा लाख रुपयांना गंडा
गुंतवणुकीची अडकलेली रक्कम व्याजासह परत देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराला पावणेदहा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दीपक शर्मा (31, रा. नोएडा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एक अनोळखी महिला व मोबाइल क्रमांकधारक आणि बॅंक खातेधारक अशा तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोहगाव येथील रहिवाशाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी एका कंपनीत चार वर्षे मुदतीवर एक लाख रुपये गुंतवले होते. कंपनी बंद पडल्याने त्यातील गुंतवलेली रक्कम परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादींना फोन केले आणि गुंतवणुकीची रक्कम व्याजासहित परत देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादींना विविध खात्यांवर रक्कम भरायला लावून 9 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली.
बॅंक खात्यातून 50 हजार पळवले
मोबाइल सिमकार्डची माहिती अद्ययावत करण्याचे सांगत चोरट्यांनी एका नागरिकास ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. या प्रकरणी एकाच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये पळवण्यात आले. याबाबत कर्वेनगरातील नागरिकाने वारजे पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारादाराशी संपर्क साधत भामट्यांनी “मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याचे काम सुरू असून, माहिती न दिल्यास सिमकार्ड बंद पडेल,’ अशी बतावणी केली आणि बॅंक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक टीम विव्हर ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि बॅंक खात्यातून 49,950 रुपये लांबविले.