पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या 30 सदस्यांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. या समितीमधील 22 सदस्य हे पुणे व पिंपरी-चिंचवड मनपांच्या नगरसेवकांमधून निवडून जाणार आहेत.
या नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च-2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी 22 सदस्यांची होणारी निवड “औट घटकेची’ ठरण्याची शक्यता आहे. तसेच या 22 सदस्यांच्या निवडीसाठी प्रशासनाला पुन्हा पुढील वर्षी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
“पीएमआरडीए’ने नुकताच प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यावर नागरिकांनी हरकती सुद्धा नोंदवल्या आहेत. पुणे महानगर नियोजन समितीवर निवडणुकीच्या माध्यमातून 30 सदस्य निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते.
मागील महिन्यात 978 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये “पीएमआरडीए’ हद्दीतील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण 30 सदस्य निवडून द्यायचे आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांमधून 22 सदस्य, नगरपरिषद क्षेत्रातून 1 सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांमधून 7 सदस्य निवडण्यात येणार आहे. या समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ, हा ते त्या पदावर असतील तोपर्यंत राहतो, अशी तरतूद आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये निवडणुकीद्वारे निवडून येणाऱ्या 22 सदस्यांचा कार्यकाळ हा मार्च 2022 पर्यंत आहे. त्यामुळे या नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त होत असल्याने त्यांची सदस्यपदही रद्द होणार आहे.
यामुळे या 22 सदस्यांना कामकाजासाठी फक्त 5 महिनेच मिळणार आहे. तसेच या काळात नियोजन समितीच्या एक किंवा दोनच बैठका होण्याची शक्यता आहे.