धक्कादायक! ‘साडी हा स्मार्ट कॅज्यूअल ड्रेस नाही’; दिल्लीच्या हॉटेलमध्ये महिलेने साडी नेसली म्हणून प्रवेश नाकारला

नवी दिल्ली : परदेशात अनेकवेळा आपण भारतीयांना त्यांच्या पेहरावावरून अडवल्याचे आपण अनेकवेळा ऐकलं आहे.  मात्र अशीच एक घटना भारतात घडली असून एका महिलेला तिने साडी नेसली म्हणून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला असल्याचे धक्कदायक प्रकरण समोर आले आहे.

दिल्लीमधील अ‍ॅक्वीला या रेस्तराँमध्ये हा सर्व प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.दिल्लीमधील ऑगस्ट क्रांती मार्ग येथे हे रेस्तराँ आहे. साडी नेसलेली एक महिला रेस्तराँमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असतानाच तिला कर्मचाऱ्यांनी अडवले. हा व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

सोशल नेटवर्किंगवर १६ सेकंदांची एक क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये प्रवेश नाकारण्यात आलेली महिला रेस्तराँच्या ड्रेसकोडसंदर्भातील नियमांबद्दल विचारणा करताना दिसत आहे. “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे नमूद करण्यात आलंय दाखवा,” असे ही महिला विचारते. यावर रेस्तराँची कर्मचारी, “मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल (कपड्यांमधील) प्रकार नाही,” असे सांगून निघून जाते.

अनिता चौधरी यांनी आधी हा व्हिडीओ शेअर केला आहे. “अ‍ॅक्वीला रेस्तराँमध्ये साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण भारतीय साडी ही स्मार्ट कपड्यांमध्ये येत नाही. मात्र स्मार्ट कपडे म्हणजे काय याची काही ठोस व्याख्या असेल तर मला सांगा. मला स्मार्ट कपडे काय असतं ते सांगा म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन,” अशा कॅप्शनसहीत त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन टीका केली आहे. ड्रेस कोड पॉलिसीसंदर्भातील धोरणांवर टीका करताना हे कसले फालतू नियम आहेत असे अनेकांनी म्हटले आहे.

भाजपा समर्थक शेफाली वैद्य यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य केले आहे. “साडी स्मार्ट वेअर आहे की नाही कोण ठरवणार?, मी अमेरिका, युएई आणि युकेमधील अनेक उत्तम रेस्तराँमध्ये साडी नेसून गेले आहे. तिथे मला कोणीही आडवलं नाही. आणि इकडे भारतामध्ये अ‍ॅक्वीला नावाचं एक रेस्तराँ भारतामध्ये ड्रेस कोड ठरवताना साडी ही स्मार्ट ड्रेसकोड नसल्याचे म्हणत आहे. विचित्र आहे हे सगळं,” अशा कॅप्शनसहीत वैद्य यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यापूर्वीही अशाप्रकारे साडी नेसलेल्या महिलांना रेस्तराँमध्ये प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडले आहेत.

इतरही अनेकांनी या प्रकराबद्दल नाराजी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.