अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकांना अवघे एक वर्ष उरले असताना विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकप्रमाणेच गुजरातेत देखील खांदेपालट होणार हे निश्चित झालं होत. नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब होणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले मनसुख मांडवीय यांपैकीच एकाला मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येईल असं देखील बोललं जात होत. मात्र आज (शनिवारी) झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांचे नाव समोर आले.
रुपाणी यांचा राजीनामा जेवढा धक्कादायक ठरला तेवढीच भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड देखील धक्कदायक ठरली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये पटेल सर्वात पाठीमागच्या ओळीमध्ये बसले होते. रुपाणी यांनी बैठकीमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या सर्व आमदारांनी सहमती दर्शवली. तेव्हा पटेल यांनी तोंडावरचा मास्क हटवत हाताने व्हिक्ट्रीचे चिन्ह दाखवले.
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. २०१७ मध्ये त्यांनी आनंदीबेन पटेल यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या घाटलोडिया येथून प्रथम विधानसभा निवडणूक लढवत जिंकली. विधानसभा सदस्य म्हणून पहिल्याच ‘टर्म’मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.