मुंबई – शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90, तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी सांगितलेलं आहे की, तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.”
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत शिवसेना नेत्यांनी आरोप लावलाय की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. राज्यात बहिणी, मुली कोणीही सुरक्षित नाही. तर जनता बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेनं, उत्तर प्रदेशातील शिवसेना कार्यालयाचं प्रसिद्ध पत्रकही ट्वीट केलं आहे.
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021