पुणे- अगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर महापालिकेतील सत्तेची भाकरी फिरविण्यासाठी राष्ट्रवादीकडून शहराची तब्बल 250 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीतील पक्षाच्या अनुभवी माजी पदाधिकाऱ्यांसह, नव्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. मात्र, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरून वादाची स्थिती उद्भवल्याने या कार्यकारिणीला वादाचे ग्रहण लागले आहे, त्याच वेळी पक्षाच्या युवक अध्यक्षांची नियुक्तीही वादामुळेच रखडल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राष्ट्रवादीकडून शहरातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची फळी उभारत या कार्यकारणीत समतोल साधण्यात आला आहे. त्यात, नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर पक्षाच्या अनुभवी पदाधिकाऱ्यांकडे कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांची जबाबदारी देत नव्या जुन्यांची मोट बांधून निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाकडून निवडणूकांची तयारी सुरू केली आहे.
या जम्बो कार्यकारिणीत महापालिकेते या पूर्वी समाविष्ट झालेल्या 11 आणि नवीन 23 गावांच्या पक्षाच्या निष्ठावाणांनाही संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून शहरात पहिल्यांदा एलजीबीटी सेल तयार केला असून त्याच्या अध्यक्षपदी सानवी मोरे असणार आहेत.
असे आहेत प्रमुख पदाधिकारी…
वडगावशेरी विधासभा अध्यक्ष – ऍड. नानासाहेब नलावडे
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष – उदय महाले
खडकवासला विधानसभा अध्यक्ष – काका चव्हाण
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष- आनंद सवाणे
कसबा विधानसभा अध्यक्ष – गणेश नलावडे
कोथरूड विधानसभा अध्यक्ष – हर्षवर्धन मानकर
हडपसर विधानसभा अध्यक्ष – डॉ. शंतनू जगदाळे
खजिनदार – निलेश निकम
प्रसिध्दी प्रमुख – अमोघ ढमाले
प्रवक्ते – नगरसेवक विशाल तांबे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक योगेश ससाणे, प्रदिप देशमुख.
शहराची लोकसंख्या लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी कार्यकारिणी पहिल्यांदाच जाहीर केली आहे. नवे आणि जुने असे सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. आगामी काळात अजून काही कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. फक्त महापालिका नाही तर येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणूका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी ही कार्यकारिणी केली आहे.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस