नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीतच देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीशी स्पर्धा करत आहे. अर्थातच ही स्पर्धा खेळातील नसून ब्रॅंड व्हॅल्युबाबत आहे. सध्या नीरजच्या ब्रॅंड व्हॅल्युमध्ये थोडीथोडकी नव्हे तर तब्बल एक हजार पट वाढ झाली आहे.
ही करार रक्कम कोहलीपेक्षा कमी असली तरीही देश पातळीवरील अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. या ऐतिहासिक पदकानंतर नीरजवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. तो आता जाहिरात क्षेत्रातही पहिली पसंती बनला आहे.
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत 87.59 मीटरवर भाला फेकला आणि भारतासाठी ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिकच्या आधी नीरज दर वर्षाला 10 ते 15 लाख रुपये जाहिरातींमधून कमावत होता. तो आता त्याच्या 10 पटीने जास्त रकमेच्या करारांवर स्वाक्षरी करत आहे.
त्याने हिटमॅन रोहित शर्मासह देशातील अन्य सर्व खेळाडूंना मागे टाकत कोहलीनंतर सर्वाधिक ब्रॅंडव्हॅल्यू असलेला दुसरा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. नीरजचे व्यवस्थापन करत असलेली संस्था लक्झरी ऑटो आणि अन्य एक कपड्यांच्या कंपनीसह करोडो रुपयांचा करार करत असून त्यामुळेच अचानक नीरजची ब्रॅंड व्हॅल्यू वधारली आहे. त्याचे हे सर्व नवे करार 2024 सालच्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत राहणार आहेत.