पिंपरी -अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी शहरात महापालिकेच्या वतीने 128 मूर्ती संकलन केंद्रांची सोय करण्यात येणार आहे. त्याशिवाय, मूर्तीदान स्विकारण्यासाठी 40 फिरत्या रथांची सोय असणार आहे. त्याशिवाय, निर्माल्य संकलनासाठी वेगळी वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहे.
गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक नियोजन सुरू केले आहे. गणेश मूर्ती दान स्वीकारण्यासाठी प्रभागनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात 4 या प्रमाणे एकूण 128 मूर्ती संकलन केंद्रांची सोय असणार आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वीकारल्या जाणार नाही. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप घालण्यासाठी परवानगी दिलेली नाही. या मंडळांनी मंदिरातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशा सूचना दिल्या आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी. मंडळाच्या परिसरात फुलांचे व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यास बंदी असणार आहे. ध्वनीक्षेपकाबाबत दिलेल्या नियमांचे पालन करावे. मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
घाटांवर गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी राहील. मोठ्या गणेश मंडळांनी श्री गणेश दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी. आरतीच्या वेळी जास्तीत जास्त पाचपेक्षा आधिक व्यक्ती शक्यतो नसाव्या. गणेश आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकांना परवानगी नसेल.