पुणे –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अभिनव संकल्पनेतून लवकरच “डिग्री प्लस’ कोर्स येत्या आठवड्यात सुरू करण्यात येत आहे. यात विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम व कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रम करतानाच विद्यार्थ्यांना अनेक कौशल्य ऑनलाइन पद्धतीने प्राप्त करून घेता येणार आहे. “डिग्री प्लस’ कोर्समुळे विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणानंतर लगेचच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
उच्च शिक्षणात भविष्यात ऑनलाइन शिक्षण हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे वारंवार म्हटले जाते. मात्र, करोनाकाळात ऑनलाइन शिक्षण हा महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पदवीचे शिक्षण ऑनलाइन सुरू असताना अन्य एखादा रोजगारक्षम अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळण्यादृष्टीने आता पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
विद्यापीठाची स्वतंत्र कंपनी असलेल्या “एसपीपीयू’ एज्युकेट फाउंडेशनच्या सहकार्याने “डिग्री प्लस’ कोर्स अंमलात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 60 कोर्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, त्यातील 30 कोर्सेसचे कंटेंट तयार झाले आहेत. एक ते सहा महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतील. त्यात ऍमेझॉन, सिंपली लर्न, कोर्सरा, सॅपसह अन्य नामवंत कंपन्यांबरोबर विद्यापीठाचा करार होत आहे. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रमास पूर्ण करण्यास हजारो रुपये शुल्क आकारले जातात. मात्र, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम विनाशूल्क पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर कौशल्प प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीही मिळू शकणार आहे.
“डिग्री प्लस’साठी स्वतंत्र पोर्टल
विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवी शिकत असतानाच एखादा ब्रिज कोर्स प्राप्त करण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन येत्या आठवड्यात होणार आहे. हे पोर्टल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. एवढेच नव्हे, प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना क्रेडिटही देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नात आहे.
कोर्सची उपलब्धता
विशेषत: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानसंबंधित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. त्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स अँड मशिन लर्निंग, क्लाऊड मनेजमेंट आणि ऍडमिस्ट्रिेशन डेव्हलपमेंट, व्हर्च्युअल लॅबद्वारे अनेक अभ्यासक्रम, ज्वेलरी, सेल्स एक्झिकेटिव्ह, म्युझिअम सेंटर, आयुर्वेदिक मसाज आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.