रायपुर – ब्राम्हण समाजाच्या विरोधात विखारी वक्तव्य केल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडिल नंदकुमार बघेल यांना आज अखेर अटक करण्यात आली असून त्यांना पंधरा दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कालच आपल्या वडिलांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे समर्थन केले होते. ते आपले वडिल असले तरी आपल्या राज्यात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काल केले होते.
नंदकुमार बघेल यांनी उत्तरप्रदेशातल दौऱ्यात तेथील लोकांना ब्राम्हण समाजावर बहिष्कार घालण्याची सुचना केली होती. या समाजाला बहिष्कृत करून त्यांना त्यांच्या मुळ ठिकाणी म्हणजे व्होल्गा नदीच्या काठी पाठवून दिले पाहिजे असेही त्यांनी म्हटले होते.
सर्व ब्राम्हण समाज संघटनेच्या वतीने त्यांच्या विरोधात छत्तीसगड मध्येच तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.